मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे एनडीएसोबत निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र भाजपकडून राज ठाकरेंना लोकसभेसाठी एकही जागा दिली जाणार नसल्याचं समोर आलं आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून राज ठाकरेंना लोकसभेसाठी एकही जागा दिली जाणार नाही. मात्र मनसेला आगामी विधानसभा आणि बीएमसी निवडणुकीत योग्य त्या जागा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी राज ठाकरेंना लोकसभा निवडणुकीदरम्यान एनडीएच्या पक्षांचा प्रचार करावा लागणार आहे आणि ४०० हून अधिक लक्ष्य साधण्यासाठी मराठी मतं मिळवण्यासाठी तयारी करावी लागेल. २००६ मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यांची भाषणाची शैली आणि सभांना होणाऱ्या गर्दीमुळे राज ठाकरेंची वेगळी ओळख आहे.
आतापर्यंत सुरू असलेल्या चर्चांनुसार, मनसेला मुंबईतून एक जागा दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दक्षिण मुंबईतून मनसेचे बाळा नांदगावकर यांचं नाव चर्चेत होतं. त्याशिवाय मनसे शिर्डीच्या जागेसाठी आग्रही असल्याचं सांगितलं जात होते. काहींनुसार, दोघांपैकी एका जागेवर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीत आगामी विधानसभा आणि महानगरपालिकांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. आधीच महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यात राज ठाकरेंच्या एन्ट्रीनंतर प्रकरण अधिक चिघळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये झालेली बैठक भविष्याच्या प्लानिंकला धरून असल्याचं समजते.
दोघांच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सकारात्मक बैठक झाली. मात्र आता कशावरही कमेंट करणं योग्य नसून येत्या काही दिवस चित्र स्पष्ट होईल.