X: @therajkaran
लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यासाठी महिना उरला असतानाही प्रमुख पक्षांचं जागावाटप झालेलं नाही. अनेक उमेदवारांची घोषणाही झालेली नाही. यावर निर्णय घेण्यासाठी रोजच्या रोज बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी मविआची (MVA) महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या प्रचाराची पुढील रणनीती आखण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीने जागावाटप अंतिम करण्यासाठी आज, २१ मार्चचा मुहूर्त निवडला आहे. या बैठकीत अंतिम चर्चा केली जाणार असून, त्यानंतर जागावाटप जाहीर केले जाणार आहे. त्यामुळेच या जागावाटपात वंचित बहुजन आघाडीला किती जागा देण्यात येतात, याबाबतही तर्कविर्तक लढवले जात आहेत. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मनसेच्या राज्यभरातील नेतेमंडळींसह पक्षातील सर्व सरचिटणीसांना आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसह पक्षाच्या गुढीपाडव्याचा मेळाव्याबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.