नागपूर- यवतमाळ वाशिम लोकोसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असणार, याचं गूढ अद्यापही कायम आहे. पाच टर्म खासदार असलेल्या भावना गवळी या जागेसाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे मंत्री संजय राठोड यांचंही नाव चर्चेत आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास उरलेले असतानाही अद्याप याबाबत निर्णय झालेला नाहीय. दोन दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी उमेदवारी मिळावी यासाठी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र या बैठकीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देत्या त्या निघून गेल्या होत्या.
आदित्य ठाकरेंचंही टीकास्त्र
यवतमाळमध्ये आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत, ठाकरेंच्या शिवसनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी शक्तिप्रदर्शन करत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर झालेल्या जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी शिंदेंची शिवसेना आणि महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाही, शिंदेंच्या शिवसेनेचा यवतमाळचा उमेदवार ठरलेला नाही, यावर टीका करण्यात आलीय. देशमुखांचा अर्ज भरण्यासाठी यवतमाळ-वाशिममधले काँग्रेसचे नेतेही झाडून उपस्थित होते. महायुती मविआच्या उमेदवाराला घाबरलेली आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. भावना गवळी यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि संजय राठोड यांच्यावर एका अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी झालेले आरोप याचा उल्लेखही आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांनी भाषणांत केला.
भावना गवळींचे कार्यतकर्तेही आक्रमक
दुसरीकडे महायुतीत भावना गवळी यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आणि गवळीही प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसतायेत.
गवळींना उमेदवारी मिळाली नसल्यानं वाशिममधील त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. उमेदवारी जाहीर झाली नाही तर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
या राड्यानंतर कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन भावना गवळींनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलंय.
चांगला निर्णय़ होईल- भाजपा नेते
यवतमाळ वाशिम ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याचं सांगत, या जागी चांगला निर्णय होईल असं भाजपा प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात शिंदेंच्या बंडांनंतर राजकीय समीकरणं बदललेली आहेत. खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड हे दोन्हीही जिल्ह्यातील ताकदीचे नेते हे शिंदेंच्या शिवसेनेत गेलेत. भावना गवळी यांच्या पाच टर्म खासदारकीनंतर त्यांच्याविरोधात असलेली एन्टी इक्मबन्सी, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळं त्यांच्याविरोधात वातावरण असल्याचं सांगण्यात येतंय. गवळींऐवजी संजय राठोडांना संधी देण्यात यावी असाही एक मतप्रवाह आहे. आता अंतिम टप्प्यात या दोघांना उमेदवारी जाहीर होते की तिसऱ्याच व्यक्तीचं नाव जाहीर होतं हे पहावं लागणार आहे.
हेही वाचाःहेमंत पाटील यांचे मुंबईत वर्षासमोर शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांनी काय दिलं आश्वासन?