मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनी लोकसभा रिंगणातून माघार घेतल्याने नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे . महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने यांच्याविरोधात शड्डू ठोकलेल्या आवाडेंना मनवण्यात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आल आहे . त्यांना सोबत घेऊनच त्यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरला आहे . त्यामुळे एक प्रकारे मुख्यमंत्री शिंदे यांना हातकणंगले मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये झालेली कोंडी फोडण्यात यश आलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात तब्ब्लल 45 मिनिटे बैठक होऊनही आवाडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे महायुतीसमोर (MahaYuti )मोठा पेच निर्माण झाला होता . हा पेच सोडवण्यासाठी आज सकाळी पुन्हा महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानें ( Dhairyasheel Mane )यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शंभूराज देसाई, रामदास कदम आवडेंच्या घरी पोहोचले. यावेळी पुन्हा उमेदवारीवरून त्यांच्याशी चर्चा करत अखेर त्यांची मनधरणी केली. त्यामुळे आवाडे यांनी आपली तलवार म्यान केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊनच माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले.त्यामुळे आता आवाडेंच्या माघारीनंतर हातकणंगले मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे .
दरम्यान हातकणंगलेमधून प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाकडून लोकसभा लढवण्याची घोषणा केली होती. आवाडे हे लोकसभेच्या मैदानात उतरल्याने हातकणंगले मतदारसंघातील लढत पंचरंगी होणार होती.मात्र आता त्यांच्या माघारीने ही लढत आता चौरंगी असली तरी आता या मतविभागणीचा नेमका फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे. या मतदारसंघात आवाडे उभे राहिले असते तर इचलकरंजीमधील मतविभागणीचा मोठा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांना धोका होता. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. अखेर आवाडेंच्या माघारीनंतर महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने यांना दिलासा मिळाला आहे .