मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता नवा ट्विस्ट आला आहे . शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील (Raghunath Patil) यांनी कोल्हापूर, हातकणंगलेसह (Hatkanangale) नऊ जागांवर भारतीय जवान किसान पार्टीकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे .. यावेळी त्यांनी स्वत: हातकणंगलेची जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघात पाच उमेदवारांमध्ये लढत होणार आहे . त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
याआधी या हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे धैर्यशील माने (Dhayirsheeil mane), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty) तर वंचितकडून दादागौडा पाटील मैदानात आहेत. अशातच आता रघुनाथदादा पाटील यांनीदेखील निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यामुळे या मतदारसंघात एकूण 5 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मागील वर्षभर भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षात काम केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारतीय जवान किसान पार्टीतर्फे लोकसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षासह (BJP) त्यांचे जुने सहकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी (Raju Shetti)यांच्यावर निशाणा साधला आहे . राजू शेट्टी यांनी मागील हंगामात ऊस दरासाठी केलेलं आंदोलन निरर्थक असल्याचं म्हणत त्यांनी शेट्टींवर हल्लाबोल केला.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 200 जागा पार करता येणार नाहीत. कारण सामान्य जनता भाजपच्या कारभारावर नाराज असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे . तसेच भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं म्हणाले आहेत . दरम्यान या मतदारसंघात पाच उमेदवारांमध्ये लढत रंगणार असल्याने बाजी कोण मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे