मुंबई: बुधवार – ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाची विधानसभेत घोषणा करण्यात आली. क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याच्या आरोपावरून संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आझमी यांच्या निलंबनाचा ठराव सभागृहात मांडला, जो अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मतांस टाकून एकमताने संमत केला.
आझमी यांना फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आले, मात्र भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली. यावर संसदीय कार्यमंत्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी निलंबनाला स्थगिती दिली असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आझमी यांची आमदारकी रद्द करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली.