X : @Rav2Sachin
मुंबई: मराठा जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मारण्याची धमकी दिल्याने मराठी अभिनेता पुष्कर जोग यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी दि म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनने मुख्यमत्र्यांकडे केली आहे.
राज्यात मराठा जातीच्या आरक्षणाच्या (Maratha reservation) अनुषंगाने सर्वेक्षण सुरु आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसोबत महापालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईत महापालिकेचे कर्मचारी (BMC employees) घरोघरी जाऊन मुलाखतीद्वारे सर्वेक्षणाचे कामकाज करत आहे. मात्र अभिनेता पुष्कर जोग (actor Pushakar Jog) यांनी सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मारण्याची धमकी दिली.
याबाबत जोग यांनी सोशल मीडिया वर पोस्ट केली आहे की, ”काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या… कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारु नका नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील.”
या पोस्टचा उल्लेख करत म्युनिसिपल युनियनने जोग यांनी दिलेली धमकी गंभीर स्वरूपाची असून या अनुषंगाने शासनाने तातडीने करवाई करावी, असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे पाठवले आहे.
दरम्यान, जोग यांच्यावर तातडीने करवाई न केल्यास विविध समाजघटक वा व्यक्तींना अशा वर्तनाने प्रोत्साहन मिळेल. याचा परिणाम सर्वेक्षणाच्या कामकाजावर होईल, असाही उल्लेख दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी निवेदनात केला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचा इशारा
त्यांनी निवेदनातून दिला आहे.