X : @NalavadeAnant
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि सत्तारूढ पक्षातील अजित पवार गटाचे मंत्री व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत असताना सोमवारी भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन्ही नेत्यांना अंगावर घेतले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ‘मला मंत्रिपदावरून काढले तरी हरकत नाही, अशा संतप्त शब्दात भुजबळ यांनी खुले आव्हानच दिले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्हीं बाजूने एकमेकांवर जरी आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी विशेषत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वजन जरांगे पाटील यांच्या पारड्यात टाकले. पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू झाल्यापासून भुजबळ काहीसे सरकारवर भडकले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी थेट अध्यादेश काढून तो जरांगे यांना उपोषणस्थळी सुपूर्द केल्याने भुजबळांच्या संतापात भर पडली आहे. आज त्यांनी शासकीय निवासस्थानी सर्वपक्षिय ओ बी सी नेत्यांची बैठक घेऊन ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. भुजबळांच्या या आवाहनावर सत्ताधारी मंत्र्यामध्येही दोन मतप्रवाह आहेत. भुजबळ यांनी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशा एका सुप्त चर्चेला सुरूवात झाली आहे. त्याची कुणकुण भुजबळ यांना लागल्यानेच आज त्यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना असा पवित्रा घेतला. आपल्याच सरकारवर दबाव तंत्राचा वापर करण्याची टोकाची भूमिका भुजबळ यांनी घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ते म्हणाले, कॅबिनेटमध्ये फूट आहे की नाही माहीत नाही. मी ओबीसींचे काम 35 वर्षापासून करत आहे आणि ओबीसींची लढाई लढत राहणार आहे. मराठा समाजाच्या धर्तीवर उद्या पटेल, गुजर आणि जाटही ओबीसीत येतील. अशा प्रकारे ओबीसीला संपवले जात आहे. म्हणूनच आम्ही ओबीसींच्या हक्कासाठी मैदानात उतरत आहोत, असे भुजबळ यांनी सांगितलं. मात्र हा विषय फक्त मराठा व कुणबी या दोन घटकांच्या आरक्षणाचा असताना त्याचा पटेल व गुज्जर जातीला कसा फायदा मिळू शकेल, त्यांचा कसा या यादीत समावेश होईल, हे मात्र तेही सांगू शकले नाहीत.
देशातील आणि राज्यातील करोडो ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेत. आमच्या आरक्षणात आता बलदंड लोक आले आहेत. त्यामुळे आमचं आरक्षण संपुष्टात आले आहे, हे सांगायला तत्त्वज्ञान मांडायची गरज नाही, असा संतापच भुजबळ यांनी व्यक्त केला. तरी ते ज्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात, त्यातीलच एका ज्येष्ठ मंत्र्याने भुजबळ यांचे म्हणणे स्पष्टपणे खोडून काढले आहे याची येथे दखल घ्यावी लागेल.
यावेळी त्यांना सरकारमध्ये राहून की बाहेर पडून आरक्षणाची लढाई लढणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर भुजबळ म्हणाले की, ते माझ्या पार्टीने आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. मला त्याची काही चिंता नाही. तुम्ही त्यांना जाऊ सांगा की भुजबळांना मंत्रिमंडळातून काढा, माझी हरकत नाही, असा संतापही भुजबळ यांनी व्यक्त केला.
Also Read: राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रातून त्या 6 जागांवर कोणाची वर्णी?