हर्षवर्धन पाटील काम करण्यास राजी
X: @therajkaran
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात यावेळी भाजपही इरेला पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सुत्र हाती घेतली आहेत. इंदापूर तालुक्यातील अजित पवार यांचे कट्टर विरोधक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बुधवारी आपल्या सागर या निवासस्थानी पाचारण करुन त्यांची व कुटुंबीयांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न फडणवीस यांनी केले. त्याला साद देत आपण या निवडणूकीत पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व ते शर्थीचे प्रयत्न करू, असे ठोस आश्वासन पाटील यांनी फडणवीस यांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
महायुतीत असल्यामुळे हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने पक्षानेही दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी तात्काळ घोषित केली. या मतदासंघातून शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या उमेदवार असल्याने दोन्ही बाजूने ही निवडणूक शर्थीने लढविली जात आहे. मात्र आपले जूने हिशोब चुकते करण्यासाठीं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे एक नेते व कधी काळी पुरंदरमधून आमदार झालेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक जिंकून अजितदादांना त्यांची जागा दाखवूनच देवू अशी थेट राणा भीमदेवी थाटाची गर्जना करत त्यांनी अजितदादांची डोकेदुखी वाढविली आहेच. तर दुसऱ्या बाजूला आता भाजपवासी असलेले अजित पवार यांचे एकेकाळचे कट्टर राजकीय हाडवैरी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही शिवतरेंच्या सुरात सूर मिसळत बंडाचा झेंडा उभारल्याने या वादात खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष देत पाटील यांना आजच्या आज आपल्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर सहकुटुंब पाचारण करत पाटील यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यामुळे हतबल पाटील यांनीही अखेर सुनेत्रा पवार यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन फडणवीस यांना दिल्याचे सांगण्यात येते.
यावेळी फडणवीस यांनीही पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले. लोकसभा निवडणुकीतील महायुतीचा उमेदवार आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपले नेते नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे बारामतीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करा, अशी सूचनाही फडणवीस यांनी पाटील यांना केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आम्हाला महायुतीला मजबूत करायचे आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे जे थोडेफार मतभेद आहेत ते दूर केले जात आहेत. त्यानुसार आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीबद्दल प्रश्न केला असता, काल त्यांची भेट झाली. त्यामुळे यावर लगेच काही बोलण्यापेक्षा एक -दोन दिवस वाट पहा. त्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याचवेळी, आजच्या भेटीत आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. स्थानिक पातळीवरील विषयांसंदर्भातही चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झालेली असून आता आमच्या विषयाच्या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते योग्य मार्ग काढतील, असा ठाम विश्वासही पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.