X: @therajkaran
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी खास मोहीम आखण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी व मंत्र्यांनी अचानक सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर (X) प्रोफाइलच्या बायोमधील माहिती अपडेट केली आहे.
आज दुपारच्या सुमारास या नेत्यांच्या एक्स हँडल्सवर नावाच्या समोर ‘मोदी का परिवार’ शब्द जोडला असल्याचे निदर्शनास आले. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gadhi ) यांनी ‘चौकीदार ही चौर हैं’ म्हणत नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर भाजपाने (BJP) ‘मैं भी चौकीदार’ म्हणत काँग्रेसला उत्तर दिलं होतं. तेव्हा भाजपाच्या जवळपास सर्वच नेत्यांनी आपल्या समाजमाध्यमांच्या खात्यांवर आपल्या नावापुढे ‘मैं भी चौकीदार’ असं लिहिलं होतं.
याप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर त्यांच्या नावापुढे तीन अक्षरं जोडली आहेत. “मोदी का परिवार” असं लिहिलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या नावामध्ये बदल केला आहे.
पाटण्यात रविवारी आयोजित इंडिया आघाडीच्या सभेत बोलताना बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी (Lalu Prsad Yadav) पंतप्रधान मोदींवर व्यक्तिगत टीका केली होती. कोण आहेत मोदी? मोदी कोणीच नाही. मोदींकडे तर त्यांचं कुटुंबही नाही. तुमच्या कुटुंबात कोणतंही मूल का नाही? जास्त मुलं असलेल्यांना बोलतात की परिवारवाद करतात. कुटुंबासाठी लढतात, मोदी तर हिंदूच नाही, असं लालू प्रसाद यादव म्हणाले होते. आता त्यांच्या या टिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, माझ्या कुटुंबावरुन माझ्यावर निशाणा साधला जात आहे. मात्र आता संपूर्ण देश सांगतोय की मी मोदीच्या कुटुंबातील आहे. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर आता अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावात बदल करत त्यामध्ये मोदींच्या नावाचा समावेश केला आहे.