महाराष्ट्र

भाजप – सेना – राष्ट्रवादी महायुती लोकसभा निवडणूकीसाठी समन्वय समिती स्थापन करणार

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीच्या ४८ लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत करुन प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वय करण्यासाठी तीनही पक्षासह एनडीएतील इतर घटक पक्षाच्या नेत्यांची सर्वसमावेशक समन्वय समिती बनविण्यासाठीचा निर्णय मंगळवारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह प्रमूख घटक पक्षनेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. 

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना यात सत्तारूढ महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या समन्वय समितीची बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुका एकसंघ व समन्वयाने लढविण्याबाबत मार्गदर्शन केले.

याबाबत माहिती देताना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड.आशिष शेलार म्हणाले की, आज तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक झाली. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचा पूर्ण विचार करताना राज्यांमध्ये ४८ लोकसभा क्षेत्रांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून ४५ च्या वर जागा निवडून येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत जे ठरले होते. ते विषय पुढे नेण्यासाठी, निर्णय करणे अपेक्षित होते. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी समन्वय समितीबरोबर अन्य नेत्यांवर असेलच, पण त्याबरोबर प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये समन्वय करण्यासाठी या तिन्ही पक्षांबरोबर एनडीएतील अन्य घटक पक्ष या सगळ्यांबरोबरची एक समन्वय समिती सर्वसमावेशक सर्वव्यापी या पद्धतीने लोकसभा क्षेत्रात करण्याचा आज निर्णय झाला. त्यासाठी नावाचा विचारही झाला असूनअंतिम निर्णय मात्र तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते करतील, असेही शेलार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुका प्रमाणेच विधानसभेच्याही २८८ मतदारसंघामध्ये आम्ही घटक पक्षांबरोबरच निवडणुकांचा विचार करत आहोत. त्यामध्ये सुद्धा एक विधानसभा क्षेत्र, एक सर्वव्यापी टीम अशी कोअर ग्रुप प्रत्येक विधानसभानुसार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असून महायुतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याबाबतीतील चर्चा पूर्ण झाली. विधिमंडळामध्ये सुद्धा ज्या विविध समित्या असतात आणि यासर्व विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या समित्यांच्या बाबतीत सुद्धा त्याबद्दल आवश्यक नावे आवश्यक कोटा आणि आवश्यक विभागणी याच्यावरही एकमत झाल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

तोही निर्णय काही दिवसात घोषित होईल. एकंदरीत नियमितपणे एकत्रित निर्णय करण्याच्या प्रक्रियेला चांगली गती या बैठकीनंतर मिळाली. तिन्ही पक्षांची महायुतीतील अन्य घटक पक्षांबरोबर चर्चेला गती मिळाली याचाही आम्हाला आनंद आहे, असेही आमदार शेलार यांनी नमूद केले.

विरोधकांच्या इंडिया आघाडीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, पहिले तर ते इंडिया नसून घमंडी अलाईन्स आहे. ते काय करतात त्यांचा त्यांना लखलाभ असो. आमच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आपापसातील संवाद हा दुसऱ्याने घडवून आणण्याची आवश्यकता नसल्यामुळे तो सहज आणि चांगला आहे. त्यांच्या स्तरावर याचा निर्णय होईल आणि झालाही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना  शेलार म्हणाले, याचा अधिकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा आहे. त्यांच्या तिघातील हा विषय असून ते तिघे निर्णय देतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, दिलीप वळसे-पाटील, दादा भुसे, धनंजय मुंडे, आ.प्रसाद लाड आणि आशिष कुलकर्णी आदी या बैठकीला उपस्थित होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात