पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार आणि कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर विरोधकांनी टीका केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली असून मी त्याबद्दल माहिती घेत आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, काही कार्यकर्ते एका घरात पार्थ पवारांना घेऊन गेले आणि ती व्यक्ती गजा मारणे होती. हे असं घडता कामा नये. माझ्या राजकीय जीवनात काम करताना एकदा असंच आझम पानसरे या माझ्या कार्यकर्त्यांनी एक पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो पक्षप्रवेश कोणाचा होता याबद्दल मला काही माहित नव्हतं. मात्र तो गुंड प्रवृत्तीचा (बाबा बोडके) होता. याबद्दलची माहिती समोर येताच, दुपारपर्यंत त्याला पक्षातून काढून टाकले.
या भेटीसंदर्भात पार्थ पवारांशी तुमची चर्चा झाली का, याबद्दल विचारलं असता अजित पवार म्हणाले, मी रात्री उशिरा पुण्याला आलो. आणि थेट या कार्यक्रमातच आलो आहे. त्याच्याशी भेट झाल्यावर नक्की सांगणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
गजा मारणे याने पत्नीसह पार्थ पवारांची भेट घेतली होती. त्याची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून करण्यात आला होता. मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ पुण्यातील भाजपच्या पदाधिकारी आहे. एका वृत्त माध्यमाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कोण आहे गजा मारणे?
गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावात जन्म झाला. पुण्यातील कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर येथे राहायला आल्यावर तो गुन्हेगारीकडे वळला. पुण्यातील घायवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद झाला होता. त्यानंतर अमोल बधे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणात गजा मारले याला अटक झाली होती. तो ३ वर्षे येरवडा तुरुंगात होता. मात्र, सबळ पुराव्या अभावी गजा मारणे याची मुक्तता झाली. जेलमधून सुटल्यावर जंगी मिरवणुक काढल्यामुळे गजा मारणे चर्चेत आला होता. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचं अपहरण केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेनं गुंड गजानन मारणेच्या मुसक्या आवळल्या होत्या. मारणे टोळीवर आजवर २३ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर गजा मारणेवर ६ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.