नवी दिल्ली
बिहारमध्ये राजकीय घडामोडी वाढतच चालल्या आहेत. जेडीयू आणि भाजपमध्ये डील झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, नितीशकुमार आणि भाजपमध्ये फॉर्म्युला ठरला आहे. जेडीयू आणि भाजप एकत्र आल्यास नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री राहतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी भाजपला मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवायचे होते. परंतू आता भाजप-जेडीयू युतीमध्ये नितीश कुमार यांची जेडीयू मोठ्या भावाची भूमिका बजावणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
बिहारच्या राजकीय घडामोडीवर काही वृत्त माध्यमांच्या बातमीनुसार, जेडीयू-भाजप एकत्र आल्यास नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. तर उपमुख्यमंत्री भाजप गटातील असेल. भाजप-जेडीयूचं एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असेल तर भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री असू शकतात.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची शक्यता बिहार भाजप नेत्यांनी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. यापूर्वी भाजपला मुख्यमंत्रीपद स्वतःकडेच ठेवायचे होते, मात्र आता नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची मागणी मान्य करण्यात आली आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजप-जेडीयू युतीमध्ये नितीशकुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री राहतील, असं सांगितलं जात आहे.
नितीश कुमार यांनी दिले होते संकेत…
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षांची आघाडी इंडियाच्या घटक पक्षांमध्ये फूट पडत असल्याचं चित्र आहे. यामुळे भाजपसोबतच्या युतीची शक्यता अधिक वाढली आहे.
येथे भाजपही नितीशकुमारांना आपल्या गोटात घेण्यास इच्छुक असल्याचे दिसते. या संदर्भात अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बिहार भाजप नेत्यांची सुमारे दोन तास महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत बिहार भाजप नेत्यांना नितीश कुमार यांच्या विरोधात वक्तव्य करणे टाळण्यास सांगण्यात आले आहे. सत्तेत राहून नितीश कुमार कधी भाजपा तर कधी राजद-काँग्रेस-डाव्या आघाडीत सामील झाले आहेत.