मुंबई
मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा प्रण मनोज जरांगे पाटील यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी केला आहे. आज सकाळपासून नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव भगवे झेंड, टोपी घातलेले दिसून येत आहे. सरकारकडून जरांगे पाटलांचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांना जीआर देण्यात आला आहे. त्यावर चर्चा सुरू असून येत्या काही वेळात ते मराठा बांधवांसमोर जीआर वाचून दाखवण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वी शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे मराठा बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दुसरीकडे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.
बारा बलुतेदारांच्या ताटातील ओबीसी आरक्षण दिवसा-ढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार आहे. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होतो की ,ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देऊ, परंतु आता उघड झाले आहे की, ओबीसी आरक्षणाच्या १९ टक्के आरक्षणामध्ये कोटींच्या संख्येने मराठा समाज आल्यावर ओबीसींचे संपूर्ण आरक्षण ते फस्त करतील. यासाठीच आम्ही सांगत होतो की, मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचे उप -वर्गीकरण करून आरक्षण द्यावे. या सर्व प्रकरणास जितके सरकार जबाबदार आहे, तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत.
आम्ही सरकारचे तसेच ओबीसी नेत्यांचा धिक्कार करतो, असा घणाघात करून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शासानासह ओबीसी नेत्यांचा निषेध व्यक्त केला. मराठा समाजाला सगे-सोयाऱ्याच्या कुणबीच्या दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदीप्रमाणे जातीचे दाखले दिल्यास ओबीसी वर प्रचंड अन्याय होईल, अशी भूमिका ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केली.