मुंबई
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीहून निघालेला मराठा बांधव आज नवी मुंबईत मुक्काम करणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला उद्यापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. मोठ्या संख्येने सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनामुळे राज्य सरकार कात्रीत सापडलं आहे. असं असतानाही मुंबईत प्रवेश केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून जरांगे पाटलांवर फुलांचा वर्षावही केला जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील उद्या आझाद मैदानात येऊन आंदोलन पुकारण्याची शक्यता आहे. आज जरांगे पाटलांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. सगेसोयरेच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने अध्यादेश काढावा, आज नवी मुंबईत मुक्काम करणार असल्याचं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. अन्यथा उद्या दुपारी १२ वाजता आझाद मैदानावर जाणार असल्याचं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

दुसरीकडे मुंबईत मात्र जरांगे पाटलांच्या स्वागताची जोमात तयारी सुरू झाली आहे. पाटलांच्या स्वागतासाठी ५०० किलो फुलं मागवण्यात आली आहे. आणि जरांगे पाटील मुंबईत आल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्याची जबाबदारी पालिकेकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय लाखांहून अधिक मराठा समाजासाठी पिण्याच्या पाण्याची आणि ३०० ई-शौचालयांची सुविधाही करण्यात आली आहे.

ओबीसी नेत्याकडून सरकारचा निषेध
आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे यांची चर्चा झाली. सरकारने सगेसोयरेच्या मुद्द्यावरुन अध्यादेश काढावे अन्य मुंबईत आंदोलन पुकारणार असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून या निर्णयवर संताप व्यक्त केला जात आहे. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. बारा बलुतेदारांच्या ताटातील ओबीसी आरक्षण दिवसा-ढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार आहे. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होतो की ,ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देऊ, परंतु आता उघड झाले आहे की, ओबीसी आरक्षणाच्या १९ टक्के आरक्षणामध्ये कोटींच्या संख्येने मराठा समाज आल्यावर ओबीसींचे संपूर्ण आरक्षण ते फस्त करतील. यासाठीच आम्ही सांगत होतो की, मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचे उप -वर्गीकरण करून आरक्षण द्यावे. या सर्व प्रकरणास जितके सरकार जबाबदार आहे, तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत, अशी भावना राठोडांनी व्यक्त केली.