Twitter : @therajkaran
मुंबई
राज्यातील अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ४ डिसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप करणार आहेत. संबंधित निवेदन महिला व बालविकास विभागाचे मंत्री, प्रमुख सचिव आणि आयुक्तांना निवेदन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम ए पाटील यांनी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवसभर काम करुन देखील अनेक व्यवसायाच्या किमान वेतनापेक्षाही अत्यंत तुटपुंजे मानधन मिळत आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये शासनाने मानधन वाढ केली. मात्र ती अत्यंत कमी हेती. सध्या महागाईमध्ये अत्यंत तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जगणे कठीण होत असल्याने आम्ही हे पाऊल उचलल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, या निवेदनात मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यात अंगणवाडी सेविकांना (Anganwadi sevika) दरमहा २६००० आणि मदतनीसांना २२००० मिळणे आवश्यक आहे. ही वाढ या वर्षी डिसेंबर पासून करावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे अंगणवाडी कर्मचारी पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अॅक्ट नुसार ग्रॅच्युईटी मिळण्यास पात्र असल्याचा निवाडा केला आहे. याची अंमलबजावणी करावी. तसेच सरकारच्या आश्वासनानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनाच्या अर्ध्या मानधानाएवढी दरमहा पेंशन देण्यात यावी.
शिवाय २००९ तसेच २०१७ या वर्षातील पुरक पोषण आहाराचा प्रति लाभार्थी प्रतिदिन अनुक्रमे ४ आणि ८ असा केला, मात्र हे दर कमी असल्याने त्यातून बालक, स्तनदा माता, गर्भवतींना पोषण आहार मिळणे कठीण झाले. त्यामुळे जीवनाश्यक खाद्य पदार्थांचे भाव वाढल्याने पुरक पोषण आहाराचे दर तिपटीने वाढवून द्यावेत, अशी मागणी यात करण्यात आली आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत नवीन मोबाईल देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल असताना देखील अद्याप तसे झाले नाही. काही काळापासून दुर्गम ते अतिदुर्गम प्रकल्पात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्याची रक्कम मिळालेली नाही. तसेच बहुतांश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजुनही सेवानिवृत्तीचे लाभ मिळाले नाहीत.
विशेष मागणी :
१७ जानेवारी २००१ व २ जानेवारी २००२ च्या शासन निर्णयानुसार १० वर्षे सेवा, ५५ वर्षाची वयोमर्यादा व एसएससी पास असलेल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यसेविकेच्या पदाकरीता पात्रात ठरविण्यात आली होती. मात्र २०२२ साली महिला व बालविकास विभागने नविन अधीसुचनेनुसार ४५ वय व पदवीधर नियम तयार केल्यामुळे वर्षानुवर्षे सेविकेमधून मुख्य सेविकेच्या पदासाठी पात्र असलेल्या अंगणवाडी सेविका मुख्यसेविका पदाकरीता अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे शासन २ जानेवारी २००२ च्या शासन निर्णयानुसार सेविकेमधून मुख्यसेविकांचे भरती करण्यात यावी व २०२२ सालाची सुचना रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे.