मुंबई
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या दाव्यात पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुढील ३० दिवसात राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचा दावा दमानियांनी केला आहे.
जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोट्स घडण्याची शक्यता असून यात काँग्रेस फूटेल, राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी किंवा नंतर मोठी घडामोड घडेल. भाजप काँग्रेसला फोडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षच उरणार नाही. अशी वेळी आमच्यासारख्यांना विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल, असं दमानियांकडून सांगितलं जात आहे.
दमानिया पुढे म्हणाल्या, ज्यांना राजकारणातून बाजूला फेकण्याची गरज आहे, त्यांना देवेंद्र फडणवीस मोठं करत आहेत. दुसरीकडे त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं कौतुक केलं. जो कुणी लढतो त्यांना अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. पण एवढा मोठा लढा उभा केल्याबद्दल जरांगे यांचं कौतुक वाटतं. मात्र जरांगे पाटलांवर ज्या प्रकारे पुष्पवृष्टी होते, २५० जेसीबी लावुन फुलं उधळली जातात, हे त्यांनी स्वत: हून थांबवायला हवं, असं यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या.
https://twitter.com/anjali_damania/status/1741732597720662149/history
तब्बल २० वर्षांनी फर्नांडिस कुटुंबाला न्याय
दमानिया यांनी २० वर्षांपूर्वी फर्नांडिस कुटुंबाला जमिनीसंदर्भातील व्यवहारात फसवल्याची तक्रार केली होती. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या कुटुंबावर फसवणुकीचे आरोप केले होते. तब्बल २० वर्षांनी या कुटुंबाला न्याय मिळाल्याचे दमानिया यांनी सांगितले. यावेळी भुजबळ कुटुंबीयांनी थकबाकी भरपाई करण्यास भाग पाडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील आभार मानले.