धाराशिव – धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या समोर कुणाचा उमेदवार असणार, .याची उत्सुकता होती. महायुतीकडून तिन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही होते. अखेरीस ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल, हे स्पष्ट होताना दिसतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत होतं. मात्र सावंत हे त्यांच्या पुतण्यासाठी आग्रही होते. या नावाला शिंदेंच्या शिवसेनेतूनच विरोध होता. त्यामुळं अखेरीस हा मतदारसंघ अजित पवारांकडे आल्याचं सांगण्यात येतंय.
कोण असेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार?
भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चचना पाटील या ओमराजेंविरोधात उमेदवार असण्याची शक्यता आहे. अर्चना पाटील यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यांना धाराशिवमधून उमेदवारी मिळेल, असं दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून अर्चना पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं सांगण्यात येतंय. प्रचार सुरु केला असला तरी त्या नेमक्या महायुतीत कोणत्या चिन्हावर लढणार हे स्पष्ट नव्हतं. आता ती स्पष्टता आल्याचं सांगण्यात येतंय.
धाराशिवसाठी कुणाकुणाच्या नावांची चर्चा?
या मतदारसंघासाठी भाजपाकडून सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, बसवराज पाटील शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड, तानाजी सावंत, त्यांचे पुतणे धनंजय सावंत तर अजित पवार राष्ट्रवादीकडून विक्रम काळे, सतीश चव्हाण यांच्या नावांची चर्चा होती.
राणा जगजीतसिंह विरुद्ध ओमराजे लढत
पुन्हा एकदा या निमित्तानं धाराशिवमध्ये ओमराजे आणि राणा जगजीतसिंह यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झालेलं आहे. ओमराजेंनी २०१९ साली राणा जगजीतसिंह यांचा पराभव केलेला होता
हेही वाचाःविदर्भात आता आदित्य ठाकरे मैदानात, यवतमाळमधून महायुतीला देणार आव्हान