नागपूर – विदर्भात रणरणत्या उन्हात प्रचारही तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरुन झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा आणि अर्ज भरण्याची लगबग सुरु झालीय. यातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं बळ वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर दाखल झालेले आहेत.
यवतमाळमध्ये आदित्य ठाकरेंची प्रचार सभा
यवतमाळ वाशिम मतदारसंघात पाच टर्म असलेल्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा संधी मिळणार की नाही, याची अनिश्चितता असतानाच आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये येतायेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरताना होत असलेल्या शक्तिप्रदर्शनात आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या प्रचारसभेत आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. यावेळी महायुतीत सुरु असलेल्या घोळाबाबत आणि भावना गवळी यांच्या भ्रष्टाचारावर आदित्य ठाकरे तोफ डागण्याची शक्यता आहे.
भावना गवळी किंवा संजय राठोड या दोघांपैकी महायुती एकाच्या नाववर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या दोन्ही नेत्यांना आदित्य ठाकरे आजच्या सभेत लक्ष्य करतील.
मोदींचे अच्छे दिन म्हणजे एप्रिल फूल
नागपुरात पोहचल्यानंतर आदित्य ठाकरेंशी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारवर चीकास्त्र सोडोलेलं आहे. त्यांनी एप्रिल फूलची तुलना मोदींच्या अच्छे दिन या घोषणेशी केली आहे. गेला दहा वर्षात देशात काय कामं झाली हे सर्वांना माहित आहे, असं सांगत जगात एप्रिल फुल हा दिवस साजरा होत असताना,आपल्याकडे तो अच्छे दिन म्हणून हा दिवस साजरा होतो. असा टोला त्यांनी लगावलेला आहे.
देशात परिवर्तन होणार- आदित्य
देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत, असं वक्तव्यही आदित्य ठाकरेंनी केलंय. दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, प. बंगाल या राज्यात इंडिया आघाडीची बांधणी मजबूत असल्याचं सांगत, या निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचाःएकनाथ खडसे भाजपात घरवापसी करणार? सुनेसाठी सासरे भाजपाच्या मैदानात?