मुंबई– पक्षात अन्याय झाला म्हणून दोन वर्षांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी घेतला होता. आता तेच एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा रंगतेय. खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांची सून रक्षा खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यानंतर राजकारण बरंच बदललं असल्याचं सांगण्यात येतंय. दोन दिवसांपूर्वी खडसेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर, खडसेंच्या घरवापसीच्या चर्चांना वेग आलेला आहे.
खडसे पुन्हा स्वगृही?
एकनाथ खडसे यांना शरद पवारांकडून लोकसभेच्या रिंगणात उभं करण्यात येईल अशी चर्चा होती. रावेरमध्ये भाजपानं रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे या दोघांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला. खडसे विरुद्ध खडसे अशी निवडणूक होणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करु असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खडसेंचा सूर मवाळ झाल्याचं मानण्यात येतंय.
रक्षा खडसेंना भाजपातून विरोध
रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली असली तरी यानिमित्तानं खडसेंचे विरोधक एकवटलेले असल्याचं सांगण्यात येतंय. नुकताच रक्षा खडसे यांना पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एकनाथ खडसेंचं नाव तुम्ही घेता मात्र गिरीश महाजनांचं का घेत नाही, असा सवाल पदाधिकारी विचारत असल्याचं दिसत होतं. या सगळ्यात मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही खडसेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. अशात रक्षा खडसेंएवजी दुसऱ्या उमेदवाराची मागणीही जोर धरतेय.
खडसे पुन्हा भाजपातून मैदानात
या सगळ्या पार्श्वभूमीर सुनेच्या मागे ठामपणे उभे राहण्यासाठी एकनाथ खडसे पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे खडसेंच्या घरवापसीसाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय. खडसे पुन्हा भाजपात आल्यास निवडणुकीच्या तोंडावर एक चांगला मेसेज मतदारांत आणि महाराष्ट्रात जाईल असंही मानण्यात येतंय. पुढच्या दोन आठवड्यात खडसे पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
हेही वाचाःमहाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी होणार? मतदारांत काय प्रतिक्रिया? महायुतीला कशाचा बसू शकेल फटका?