मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अखेर तब्बल ५० दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळताच ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जोमाने तयारीला लागले आहेत . आज केजरीवाल हे कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत . यानंतर ते दक्षिण दिल्लीतील महरौली भागात रोड शो करत पून्हा सहा वाजता पूर्व दिल्लीच्या कृष्णानगरमध्ये देखील रोड शो करणार आहेत.
देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं वातावरण तापल असून प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे . मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना काल संबोधित केलं. “मला आपल्या देशात असणाऱ्या हुकूमशाहीविरोधात लढायचं आहे . मला तुमच्यात येऊन आनंद होतो आहे. परंतु देशातल्या १४० करोड लोकांनी या लढाईत एकत्र आलं पाहिजे.” असं ते म्हणाले आहेत आज ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सक्रिय होणार आहेत . .दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला होता. आता अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानं आम आदमी पक्षाचं बळ वाढणार आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Singhvi) यांनी या घोटाळ्याप्रकरणी 4 जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, प्रचार 48 तास अगोदर संपतो, असं सांगत न्यायालयाकडून केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला. दरम्यान, पंजाबमध्ये 25 मे तर दिल्लीत 1 जूनला मतदान पार पडणार आहे. अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काहीही बोलू शकत नाहीत, अशी अटही त्यांना घालण्यात आली आहे. आज होणाऱ्या रोड शो सह पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .