महाराष्ट्र ताज्या बातम्या

आडम मास्तरांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सोलापूर मध्य मतदार संघावर दावा

X : @vivekbhavsar

काँग्रेससह महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे जवळपास २६० जागांवर एकमत झाले आहे. २८ जागांबाबत अजूनही वाद सुरू आहेत. या २८ जागांमध्ये खास करून समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य छोट्या घटक पक्षांना किती जागा द्याव्या, यावरून वाद सुरू  आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 12 जागांची मागणी केली होती, मात्र चार जागांवर त्यांचा आग्रह आहे. यात आडम मास्तरांसाठी सोलापूर मध्य मतदार संघाची प्रमुख मागणी आहे. 

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. येत्या 22 तारखेपासून निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 288 पैकी 260 जागांवर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमत झालेले आहे. अजूनही 28 जागेवरचा तिढा कायम आहे. 

समाजवादी पार्टी, डावे पक्ष आणि अन्य काही पक्ष महाविकास आघाडीसोबत येणार आहेत. या घटक पक्षांकडून काही जागा सोडण्याची मागणी होत आहे. मालेगाव मध्य मतदारसंघावर समाजवादी पार्टीने दावा केला आहे. दिवंगत आमदार निहाल अहमद यांच्या कन्या शान ए हिंद यांना तिकीट देण्याची समाजवादी पार्टीची तयारी आहे. मात्र या जागेवरही काँग्रेसने दावा केल्याने काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागा वाटपावरून धसपूस आहे.

Also Read: मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात हमरीतुमरी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एकूण 12 जागांची मागणी केली होती. यात डहाणू, कळवण, सोलापूर (मध्य), नाशिक (पश्चिम), अकोले, किनवट, माजलगाव, पाथरी, दिंडोरी, इगतपुरी, विक्रमगड आणि शहापूर या 12 मतदारसंघाचा समावेश आहे. यात डहाणू येथे विनोद निकोले 2019 मध्ये निवडून आले असल्यामुळे ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाच द्यावी लागणार आहे. 

तर सात वेळा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण या मतदारसंघातून निवडून आलेले आणि मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले जीवा पांडू गावित यांच्यासाठी कळवणची जागा माकपने मागितली आहे. नाशिक पश्चिम मधून कामगार नेते डॉ डी एल कराड यांना तिकीट देण्याची माकपची तयारी आहे.

माजी आमदार नरसय्या आडम यांनी बिडी कामगार, अल्पसंख्यांक, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सोलापूरमध्ये प्रचंड काम केले आहे. आडम मास्तरांसाठी सोलापूर (मध्य) ची जागा सोडा, असा आग्रह माकपने धरलेला आहे. सोलापूर (मध्य) मधून 2009 पासून मागच्या सलग तीन विधानसभा निवडणुका प्रणिती शिंदे यांनी जिंकल्या होत्या. प्रणिती सध्या लोकसभा सदस्य असून ही जागा मास्तरांसाठी सोडा, असा आग्रह माकप धरत आहे. 

दरम्यान बिडी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नरसय्या आडम यांनी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर कौतुक केले होते. याबद्दल पक्षाने त्यांना तीन महिन्यासाठी निलंबित केले होते. 

याशिवाय नगर जिल्ह्यातील अकोले हा आदिवासी राखीव मतदारसंघ देखील आपल्याला सोडावा, अशी मागणी माकपणे केली आहे. या मतदारसंघातून पूर्वी माकपचे बी.के. देशमुख निवडून गेले होते, अशी आठवण कॉम्रेड डॉ अजित नवले यांनी करून दिली. या मतदारसंघातून एकनाथ मेंगाल यांना पक्षाकडून तिकीट देण्याची पक्षाची इच्छा आहे, अशी ही माहिती डॉ नवले यांनी दिली. 

डॉ नवले म्हणाले, मतदार संघात आमचे किती मते आहेत, हा निकष तुम्ही आम्हाला लावू नका. कम्युनिस्ट पक्षाने आशा मदतनिसांची संघटना बांधलेली आहे, बांधकाम कामगारांची संघटना बांधली आहे, किसान सभेच्या माध्यमातून प्रत्येक मतदार संघामध्ये आमचे काही ना काही पॉकेट्स आहेत, ही बाब विचारात घेऊन महाविकास आघाडीने आम्हाला किमान चार जागा तरी सोडाव्यात, अशी मागणी डॉ नवले यांनी केली. 

दरम्यान, येत्या दोन दिवसात महाविकास आघाडी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. या यादीत छोट्या घटक पक्षांना देण्यात येणारे मतदारसंघ वगळून उर्वरित जागा जाहीर केल्या जातील, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात