By Yogesh Trivedi
मुंबई: एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जोरजोरात डांगोरा पिटला जातोय आणि सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यात दर महिन्याचे दीड दीड हजार रुपये जमा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला गर्भवती महिलांना बोरीवली पूर्व येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातून माता व बालक रुग्णालयात आणि तेथून परळच्या राजे एडवर्ड स्मृती बाह्य रुग्णालय (केईएम) येथे पाठविण्यात आहे. गर्भवती महिलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणावर ससेहोलपट होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सामान्य माणसाला हा द्राविडी प्राणायाम अशक्य होत असून यातून गर्भवती महिला, तिच्या पोटातील गर्भ यांना धोका निर्माण होण्याची भीती आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असून सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.
यावर राज्य सरकारने, आरोग्य खात्याने, संबंधितांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना शाखा क्रमांक १४ च्या शाखा संघटक सौ. कांचन सार्दळ यांनी केली आहे.