सोलापूर – राज्यातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीची घोषणा गुरुवारी करण्यात आली. त्यात सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यानंतर गुरुवारी रात्री त्यांच्या गाडीवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. या आरोपामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे.
नेमकं काय घडलंय?
प्र्णिती शिंदे गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. सोलापूर जिल्हा पिंजून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातच गुरुवारी त्या पंढरपूरच्या दौऱ्यावर होत्या. सारकोली गावात प्रणिती शिंदे पोहचलेल्या असताना त्यांना काही आंदोलकांनी अडवलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभरात नेत्यांसाठी गावबंद आंदोलोनही सुरु आहे. गावात येणाऱ्या नेत्यांना या प्रकरणी जाब विचारण्यात येतोय.
प्रणिती शिंदे यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली भाजपाचे कार्यकर्ते गैरफायदा घेत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय, भाजपाकडून मराठा आंदोलोन बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्या म्हणाल्यात.
राज्यभरात चुरशीच्या लढती
महायुती विरुद्ध मविआ असा संघर्ष राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दिसणार आहे. त्यात काही गुन्हेगारी घटनाही घडण्याची शक्यता आहे. प्रणिती शिंदे यांनी केलेल्या या आरोपांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्था योग्य राहावी यासाठी प्रशासनाला येत्या काळात अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.
हेही वाचाःरोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या, सुप्रिया सुळे यांची मागणी