बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार या सामन्यात आणखी चुरस पाहायाला मिळणार आहे. यापूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. यातच आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनंही या मतदारसंघात उमेदवार दिला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
मराठा क्रांती मोर्चाचा काय निर्णय?
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एक उमेदवार देणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं. बारामती शहरातील जिजाऊ भवन येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. त्यात एकमतानं हा निर्णय घेण्यात आलाय. लवकरच बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील समन्वयकांची बारामतीत बैठक होईल आणि त्यानंतर उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येणार आहे.
शिवतारेंपाठोपाठ चौथा उमेदवार रिंगणात
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष रंगणार आहे. त्यात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना विजय शिवतारे यांनी पवारांचा पराभव करण्याचा विडा उचललेला आहे. पवारांविरोधात साडे पाच लाखं मत असल्याचं सांगत पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न शिवतारे करतायेत. दुसरीकडं मराठा संघटनांनीही उमेदवार दिल्यास मतविभाजनाचा फटका दोन्ही पवारांना बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा – कोकणातला राजकीय शिमगा सुरुच, महायुतीची उमेदवारी कुणाला? अद्यापही गुलदस्त्यात; राणे-जठार की सामंत सगळेच वेटिंगवर