मुंबई : दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली .त्यामुळे त्यांना आता तिहार कारागृहात पाठवण्यात आले आहे . यापूर्वी त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यात त्यांनी तीन पुस्तके तुरुंगात नेण्याची परवानगी मागितली आहे. या पुस्तकांमध्ये भगवद्गीता, रामायण आणि ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या ‘हाऊ प्राईम मिनिस्टर डिसायड्स’ या पुस्तकाचा समावेश आहे. यासोबतच त्यांनी जेलमध्ये काही आवश्यक औषधे, गळ्यातील धार्मिक लॉकेट आणि कारागृहात टेबल-खुर्ची देण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंग क्रमांक 2 मध्ये ठेवणार आहेत .तेथे ते बॅरेकमध्ये एकटेच राहतील. तिहार तुरुंगात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 24 तास सीसीटीव्ही मॉनिटरिंग असणार आहे दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना तुरुंग क्रमांक दोनमधून तुरुंग क्रमांक पाचमध्ये हलवण्यात आले आहे. मनीष सिसोदिया यांना तुरुंग क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले आहे, तर सतेंद्र जैन यांना तिहार तुरुंगातील सात क्रमांकाच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. याशिवाय, बीआरएस नेत्या के कविता यांना लेडी जेल क्रमांक 6 मध्ये ठेवण्यात आले होते . दरम्यान तुरुंगातून सरकार चालवण्याच्या प्रक्रियेवर तिहार तुरुंगाचे माजी पीआरओ सुनील कुमार गुप्ता (Sunil Kumar Gupta)यांनी प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले , हे खूप आव्हानात्मक असेल. मुख्यमंत्र्यांसोबत वैयक्तिक कर्मचारी असावा. आत्तापर्यंत 16 तुरुंग असून त्यापैकी एकाही ठिकाणी मुख्यमंत्री धावू शकतील अशी कोणतीही सुविधा नाही. यासाठी सर्व नियम मोडावे लागतील. इतके नियम कोणीही मोडू देणार नाही. सरकार चालवणे म्हणजे केवळ फायलींवर सह्या करणे नव्हे. सरकार चालवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठका बोलावल्या जातात. मंत्र्यांचा सल्ला घेतला जातो आणि भरपूर कर्मचारी आहेत. LG सोबत मीटिंग्ज किंवा टेलिफोन संभाषणे आहेत. कारागृहात टेलिफोनची सुविधा नाही. लोक आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला येतात. तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय निर्माण होणे अशक्य आहे. तुरुंगात कैदी दररोज ५० मिनिटे त्यांच्या कुटुंबीयांशी बोलू शकतात आणि हे सर्व रेकॉर्ड केले जाते.असे त्यांनी सांगितले .
दरम्यान ईडीच्या वतीने एएसजी राजू यांनी न्यायालयात सांगितले की, विजय नायर अरविंद केजरीवाल याच्या जवळचा आहे. केजरीवाल यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, विजय नायर थेट मला भेटत नव्हते, ते आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करायचे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच या प्रकरणात आतिशी मार्लेन आणि सौरभ भारद्वाज यांची नावे आली आहेत.