मुंबई
X : @MeenalGangurde8
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र लोकसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत अस्वस्थतेमुळे काही उमेदवार दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात, असेही आडाखे बांधले जात आहे. यात छगन भुजबळांबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
मंत्री छगन भुजबळ हे अजित पवार गटात अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा आरक्षणावर घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे भाजपमध्ये राज्य पातळीवर पॉवरफूल ओबीसी नेतृत्व दिसून येत नाही. चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडेंना मर्यादा आहे. अशावेळी छगन भुजबळांची एन्ट्री भाजपमधील ओबीसी नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकते. भुजबळ कुटुंबातून स्वत: छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नाशिकमध्ये पुन्हा ‘भुजबळराज’?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ सध्या येवला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र नाशिकवर त्यांचा चांगला होल्ड आहे. अशावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास भुजबळांना राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं. सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. आगामी लोकसभेत या जागेवरुन भुजबळ कुटुंबातील सदस्याला भाजपकडून तिकीट दिलं जाण्याची शक्यता असून याऐवजी शिवसेनेच्या शिंदे गटाला धुळ्याची जागा दिली जाऊ शकते. धुळे लोकसभा जागेवर भाजपचे सुभाष भामरे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याऐवजी शिंदे गटाला ही जागा दिली जाऊ शकते. या जागेवर दादा भूसे किंवा त्यांचे सुपूत्र अविष्कार भुसे निवडणूक लढवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेमंत गोडसे नाशिकमध्ये ठरले होते ‘जायंट किलर’
२०१४ च्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी मनसेकडून पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली होती. तेव्हा गोडसेंनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ मध्ये गोडसेंनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना खासदारकी लढवण्याची संधी दिली. त्यावेळी लोकसभेत हेमंत गोडसे विरूद्ध राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ अशी लढत होती. मात्र त्यावेळीही भुजबळांचा पराभव करीत गोडसे जायंट किलर ठरले.