मुंबई
राज्यातील सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये अशोक चव्हाण, भाजपच्या पुण्यातील नेत्या मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांच्या नावांचा समावेश आहे.
यावेळी भाजपकडून राज्यसभेसाठी ओबीसी-मराठा-ब्राम्हण (महिला) अशी त्रिसूत्री राबवत समतोल साधल्याचं दिसून येत आहे. भाजपकडून राज्यसभेत लिंगायत समाजाचे डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. यांचं नाव राजकीय वर्तुळात अद्याप तितकेसे परिचित नाही. मात्र यांच्यानिमित्ताने लिंगायत (ओबीसी) समाजही आपल्या सोबत असल्याचं दाखवलं जात आहे. गोपछडे भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक आहे. याशिवाय ते एक कारसेवक आणि भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रमुख आहेत. कोरोना काळात त्यांनी मोलाचं काम केलं होतं. गेल्या काही दिवसात राज्यसभेतील उमेदवारांच्या शर्यतीत गोपछडे यांचं नाव कुठेच दिसत नव्हतं. मात्र भाजपने शेवटच्या क्षणी धक्का देत गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपमधील डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेसाठी संधी मिळाली आहे. डॉ. गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत.
दुसरं नाव आहे कालच भाजपवासी झालेले अशोक चव्हाणांचं. सध्या राज्यात मराठा आरक्षणावरुन गदारोळ सुरू असताना भाजपचा मराठा नेतृत्व करणारा चेहरा, मराठवाड्यातील हुकूमी एक्का म्हणून अशोक चव्हाणांकडे पाहिलं जाऊ शकतं.
त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणूक स्वत:चा मतदारसंघ हातातून गेल्यानंतरही पक्षाशी निष्ठा कायम राखलेल्या महिला चेहरा म्हणजे पुण्याच्या मेधा कुलकर्णी. चंद्रकांत पाटलांना कोथरूड मतदारसंघातून तिकीट दिल्यानंतर त्या नाराज असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे कुलकर्णींना ब्राम्हण महासंघाचा पाठिंबा आहे. २०१४ मध्ये जेव्हा मेधा कुलकर्णींना डावलून चंद्रकांत पाटलांनी विधानसभेचं तिकीट दिलं होतं, त्यावेळी पुणे ब्राम्हण महासंघाकडून त्यांचा विरोध करण्यात आला होता. त्यामुळे ब्राम्हण आणि त्यात महिला असल्याने भाजपसाठी हे गणित फायद्याचं ठरेल.
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर कसबा पेठ मधून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. कसबा पोटनिवडणुकीत ब्राह्मणांवर अन्याय झाल्याचा प्रचार झाला होता. यावेळी हिंदू महासंघाने थेट भाजपलाच सुनावलं होतं. मात्र आता मेधा कुलकर्णींना उमेदवारी देऊन ब्राह्मण समाजाला चुचकारलंय असं म्हणता येईल