X: @therajkaran
गेल्या काही दिवसापूर्वी भाजपने (BJP) जाहीर केलेल्या यादीत रावेर (Raver) मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची उमदेवारी जाहीर करण्यात आली. सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) विरुद्ध रक्षा खडसे अशी लढत पार पडणार, अशी जोरदार चर्चा असताना आता प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणं अशक्य असल्याचं जाहीर केली आहे. खडसे यांच्या माघार घेण्यामुळे रक्षा खडसे यांची उमदेवारी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपच्या वरिष्ठ पातळीवर यंदा जळगाव जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात येणार होता. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar group) जळगाव येथे पार पडलेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यासपीठावरुन बोलताना थेट एकनाथ खडसे यांची रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपची अडचण झाली असल्याचे दिसून आलं.
मात्र खडसे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले. यामुळे आपोआपच भाजपची मोठी अडचण होणार आहे.
भाजपचे नेतृत्व करणाऱ्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना त्यांचे निकटवर्तीय माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे सुपूत्र अमोल जावळे यांना उमेदवारी द्यायची होती. परंतु, एकनाथ खडसे यांना शह देण्याच्या नादात जवळच्या व्यक्तीला डावलत एकनाथ खडसे यांच्या सून आणि विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. सध्या राजकीय वर्तुळात अशा देखील चर्चा होत आहेत की, एकनाथ खडसे यांच्या ऐवजी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची देखील उमेदवार म्हणून घोषणा होऊ शकते. परंतु रोहिणी खडसे यांनी मात्र स्पष्ट नकार दिला आहे. त्या म्हणाल्या की, मी मागील 4 वर्षांपासून मुक्ताईनगर विधानसभेची तयारी करत आहे. यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे, त्यामुळे सध्या तरी खासदारकीबाबत कोणताही विचार माझ्या मनात नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.