X: @therajkaran
अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या घोषणेनंतर चंद्रहार पाटील जोमाने प्रचाराला लागले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) ठिणगी पडली आहे. ठाकरेंनी सांगलीचा (Sangli) उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
ठाकरेंनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणे हे अडचणीचे झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये हे व्हायला नकोय. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने नाव जाहीर करणे योग्य झालेलं नाही, अशा शब्दांत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सांगलीच्या या मैदानात चंद्रहारच लढणार, चंद्रहार जिंकणार आणि हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र डबल केसरी त्याची विजयाची गदा आणि एका हातात मशाल घेऊन दिल्लीच्या संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी सभा देते, असा विश्वास ठाकरे गटाकडून जाहीर सभेत व्यक्त करण्यात आला.
सांगलीच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये (MVA) काही दिवसांपासून वाद सुरू होता. आम्ही कोल्हापूरची जागा सोडली. त्यामुळे सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही, असा दावा ठाकरे गटाने केला होता. तर सांगली हा आमचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्ही ती जागा सोडणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. काँग्रेस या जागेवर विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याच्या विचारात होती. मात्र उद्धव ठाकरेंनी भर सभेत चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता निवडणुकीपर्यंत मविआमध्ये आणखी काय उलथापालथ होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.