नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर नाराज असल्याकारणाने छगन भुजबळ यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे. इतर मतदारसंघामधील ओबीसी मते भाजपकडे वळविण्यासाठी ही खेळ उपयोगी ठरेल, असा अंदाज भाजपकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघाचा तिढा वाढलेला दिसून येत आहे.
नाशिक मतदारसंघात दोन टर्म विजयी झालेले शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून तिसऱ्यांदा नाशिक मतदारसंघातून हक्क सांगितला जात आहे. मात्र भाजप आणि अजित पवार गटाकडून स्थानिक पातळीवर गोडसेंचा विरोध केला जात आहे. काही दिवसांपूर्वी हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. शिंदे यांनीही या जागेवर आपलाच दावा असल्याचं आश्वासन दिलं होतं.
दरम्यान छगन भुजबळ यांच्यासाठी थेट दिल्लीहून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांनीही नाशिकमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघ नाशिक शहरात असून तिथं भाजपचे आमदार आहेत. त्याशिवाय महापालिकाही भाजपच्या ताब्यात असल्याचं कारण देऊन भुजबळ यांना कमळ चिन्हावर लढण्यास सांगितलं गेल्याची माहिती आहे.