मुंबई
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत भाजपामध्ये कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आव्हाडांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटवरुन सध्या जोरदार (Jitendra Awhad’s sensational claim) चर्चा सुरू झाली आहे.
जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.
नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?
‘आमच्या पक्षात मंत्र्यांपेक्षा भाजपाचा महामंत्री मोठा असतो. आहे. मंत्र्यांना जेवढा मान आहे किंवा त्यांच्या आदेशाला जेवढे महत्त्व आहे, त्याहून अधिक महत्त्व आणि मान महामंत्र्यांना असतो. आमच्याकडे कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. हर एक के अच्छे दिन आयेंगे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.