मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने भाजपाने (BJP)जय्यत तयारी केली असून यावेळी निवडणुकीच्या रिंगणात सेलिब्रिटींना ( Star Powar Celebrity )उतरवले आहेत. भाजपाने आतापर्यंत उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौतपासून भोजपुरी स्टार मनोज तिवारी, निरहुआ यांच्यापर्यंतच्या उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपाने रविवारी जारी केलेल्या पाचव्या यादीत एकेकाळी तुफान लोकप्रिय झालेल्या रामायण या टीव्ही मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल(Arun Goviel )यांना उत्तर प्रदेशातील मेरठमधून, तर बॉलिवूड क्वीन कंगना रणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. हे दोन्ही कलाकारांचे लोकप्रियतेचे वलय अद्याप कायम आहे. दरम्यान पहिल्या यादीत ईशान्य दिल्लीतून भोजपुरी स्टार मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली. ते या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. याशिवाय, आझमगडमधून भोजपुरी चित्रपट गायक, अभिनेता दिनेशलाल यादव ऊर्फ ‘निरहुआ’ यांना पक्षाने तिकीट दिले आहे. निरहुआ यांचा सामना धर्मेंद्र यादव यांच्याशी होणार आहे. आझमगडचे विद्यमान खासदार निरहुआ यांनी पोटनिवडणुकीत धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला होता. भाजपाने पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून भोजपुरी अभिनेता पवन सिंग यांना तिकीट दिले होते, मात्र नंतर त्यांनी तिकीट परत केले आणि निवडणूक लढविण्यास नकार दिला.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी(Smriti Irani) या उत्तर प्रदेशातील अमेठीमधून निवडणूक लढवणार असून त्या या मतदारसंघातील विद्यमान खासदारही आहेत.त्या राजकारणात येण्यापूर्वी अभिनेत्री आणि टेलिव्हिजन निर्मात्या होत्या. याशिवाय बॉलीवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी (Hema Malini )उत्तर प्रदेशातील मथुरा येथून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्या सलग 2014 आणि 2019मध्ये या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.पश्चिम बंगालमधील हुगळी मतदारसंघातून भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार लॉकेट चॅटर्जी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी यापूर्वी बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. केरळमधील त्रिशूर येथून प्रसिद्ध गायक आणि दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते सुरेश गोपी यांना भाजपाने तिकीट दिले आहे. आता ही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेली ‘स्टार पॉवर’ भाजपाला किती फायदेशीर ठरते, येत्या 4 जूनला स्पष्ट होणार आहे.