मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची (Uddhav – Raj alliance) घोषणा झाल्यानंतर मुंबई महापालिकेतील (BMC elections) जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र भांडुप विधानसभा Bhandup Assembly constituency) मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११४वरून अद्याप स्पष्ट तोडगा निघालेला नसल्याने, युतीतील पहिला मोठा पेच याच प्रभागात निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या अनिशा माजगावकर (MNS Leader Anisha Majgaonkar) या नेमक्या कोणाकडून निवडणूक लढणार—भाजपकडून (BJP) की शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena)? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आला आहे.
ठाकरे युती आणि भांडुपमधील ‘अडचण’
ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने मराठी मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असला, तरी प्रत्यक्षात जागावाटप—कोण किती जागा, कुठे कोण उमेदवार—याबाबत अजून स्पष्टता नसल्याने काही मतदारसंघांमध्ये संभ्रम आहे. त्यातच भांडुपमध्ये प्रभाग ११४वर दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्याने युतीचे ‘घोडे’ अडकल्याचे मानले जाते.
उबाठाचा दावा: संजय दिना पाटील यांच्या कन्येसाठी ११४?
मनसेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाचा (उबाठा) विचार हा प्रभाग ११४मधून खासदार संजय दिना पाटील (MP Sanjay Dina Patil) यांच्या कन्येला मैदानात उतरवण्याचा असल्याची चर्चा आहे.
या प्रभागातून २०१७ साली शिवसेनेचे रमेश कोरेगावकर निवडून आले होते. कोरेगावकर हे २००२ पासून सलग चार वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पुढे २०१९ मध्ये ते भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्याच तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते.
मात्र, यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोरेगावकर यांनी स्वतः किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने, प्रभाग ११४ मध्ये उबाठाच्या नव्या उमेदवारासाठी जागा मोकळी झाली—आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय दिना पाटील यांच्या कन्येसाठी दावा पुढे आल्याचे सांगितले जाते.
राज ठाकरे यांची अट: ‘कोरेगावकर कुटुंब असेल तरच जागा’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (Maharashtra Navnirman Sena) सूत्रांनुसार, राज ठाकरे (Raj Thackeday) यांनी ११४ संदर्भात अट घातली आहे— कोरेगावकर स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य निवडणूक लढवत असेल तरच ही जागा उबाठा सेनेला सोडण्यात येईल; अन्यथा मनसे ही जागा स्वतः लढवेल, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याची माहिती आहे.
अनिशा माजगावकर: २०१२ची विजयी, २०१७ची ‘कडवी लढत’
या प्रभागात मनसेच्या अनिशा माजगावकर यांचा स्थानिक आधार महत्त्वाचा मानला जातो. त्या २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या. तर २०१७ मध्ये त्या रमेश कोरेगावकर यांच्या विरोधात पराभूत झाल्या होत्या.
तरीही २०१७ मध्ये त्यांनी कडवी झुंज दिली होती. रमेश कोरेगावकर यांना ९,८८७ मते तर अनिशा माजगावकर याना ८,३०२ मते (दुसरा क्रमांक) मिळाली होती.
पराभवानंतरही त्यांचा जनसंपर्क कायम असल्याचे स्थानिक पातळीवर सांगितले जाते.
११५ वरही अडथळा: उमेश माने यांच्या पत्नीचा प्लॅन
दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून अनिशा माजगावकर यांना ११५ मधून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती.
प्रभाग ११५ हा आता सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव झाला आहे. याच प्रभागातून यापूर्वी अखंड शिवसेनेचे उमेश माने निवडून आले होते. राखीव झाल्यामुळे उमेश माने हे पत्नीला प्रभाग ११५मधून लढवणार असल्याची चर्चा आहे.
या स्थितीत ठाकरे बंधूंची युती झाल्याने अनिशा माजगावकर यांच्यासाठी ११४ आणि ११५ या दोन्ही पर्यायांचे दरवाजे बंद झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.
मग ‘प्लॅन-बी’: भाजप किंवा शिंदेंची शिवसेना?
याच पार्श्वभूमीवर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भांडुप प्रभाग ११४ भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेना यापैकी ज्या पक्षाला सुटेल, त्या पक्षाकडून अनिशा माजगावकर यांना उमेदवारी देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची चर्चा आहे. माजगावकर यांचे प्रबळ नेटवर्क, मतदारांशी असलेला संपर्क याचा फायदा युतीला होईल असा दावा युतीच्या नेत्यांकडून केला जात आहे.
म्हणूनच आता भांडुपच्या राजकारणात प्रश्न एकच:
अनिशा माजगावकर नेमक्या कोणाकडून लढणार—भाजपकडून की शिंदेंच्या शिवसेनेकडून?

