X: @Rav2Sachin
मुंबई: मागील वर्षी मुंबई अग्निशमन दलाच्या सर्वात मोठ्या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना कामावर हजर राहून ही प्रशिक्षण भत्ता आणि वेतनही मिळालेले नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मागील वर्षी अग्निशमन दलात जवानांच्या भरतीसाठी संबंध महाराष्ट्र राज्य आणि अन्य राज्यांतून लाखों इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल झाले होते. यातून अग्निशमन दलात 910 उमेदवारांची निवड करण्यात आली. यामध्ये महिला आणि पुरुष उमेदवार होते. महिला उमेदवारांसाठी 273 जागा होत्या.
पहिल्या टप्प्यात 555 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यांना 5 जुलै 2023 पासून प्रशिक्षणासाठी अग्निशमन दलाच्या वडाळा, मानखुर्द, बोरिवली आणि विक्रोळी येथे प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. उमेदवारांचे प्रशिक्षण 5 जानेवारी 2024 रोजी पर्यंत होते. प्रशिक्षणात 555 पैकी 459 उमेदवार पास झाले. जे प्रशिक्षणात अनुत्तीर्ण झाले त्यांना पुन्हा दुसऱ्या टप्प्याच्या प्रशिक्षणात वाढीव प्रशिक्षण देण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे.
Also Read: अग्निशमन दलाच्या नव्या भरतीच्या जवानांना ना भत्ता ना वेतन
डिसेंबर 2023 पासून दुसऱ्या टप्प्यातील 355 उमेदवारांना अग्निशमन दलाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे. येत्या मे 2024 मध्ये प्रशिक्षण संपणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना कामावर घेण्यात येणार आहे.
सध्या पहिल्या टप्प्यात प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्या 459 पुरुष आणि महिला उमेदवारांना 23 जानेवारी 2024 पासून अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांना अग्निशमन दलाच्या 35 फायर स्टेशन आणि कंट्रोल रुममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
पण 23 जानेवारी 2024 पासून 459 पुरुष आणि महिला उमेदवारांना सेवेत दाखल करुन आज 37 दिवस उलटून त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. नवीन भरती झालेल्या उमेदवारांना 40 हजार रुपये वेतन आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2024 च्या पूर्ण महिन्याचे 40 हजार रुपये वेतन आणि जानेवारी 2024 महिन्यातील 9 दिवसांचे 12 हजार रुपये वेतन त्यांना मिळालेले नाही.
प्रत्येक उमेदवाराला प्रशिक्षण भत्ता 3 हजार रुपये महिना आहे. एका उमेदवाराचे 6 महिन्याचे प्रशिक्षण भत्ता 18 हजार रुपये आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील एकाही उमेदवाराला प्रशिक्षण भत्ता मिळालेला नाही, अशी धक्कादायक माहिती अग्निशमन दलातून समोर आली आहे.