X: @therajkaran
मुंबई: यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम रु. ५,००,०००/- व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वरील क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविषयी प्राप्त झालेल्या शिफारशींचा विचार करून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर (Dr Anil Kakodkar) यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीने ‘डॉ. सौम्या स्वामीनाथन’ यांची सन २०२३ च्या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे अलौकिक, अतुलनीय कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी, म्हणून यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३, डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) यांना देण्याचे चव्हाण सेंटरने जाहीर केले आहे.
डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचे कार्य लक्षात घेऊन हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे मंगळवार, दि. १२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते वितरीत करण्यात येईल.
Also Read: लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार, कोल्हापूरात शाहू महाराजांसाठी काम करण्यास तयार