मुंबई: महाराष्ट्रात स्वराज्य नावाचा पक्ष स्थापन करून महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्याची योजना रचणारे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार ( withdrawal from Lok Sabha elections) घेतली आहे. त्याऐवजी त्यांनी कोल्हापुरात त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचेच काम करायचा निर्णय घेतला आहे.
संभाजीराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून उतरायचे मी ठरवले होते. कोल्हापूर की नाशिक एवढाच माझा निर्णय बाकी होता, पण ज्यावेळी आमच्या बाबांनी (शाहू महाराज) कोल्हापूर येथून निवडणूक लढविण्याचे ठरले, त्यावेळी त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं मी सांगितलं. त्यांनी निवडणूक लढावी असा लोकांचा आग्रह होता. तसेच त्यांचीही इच्छा होती. माझे वडील, मोठे महाराज माझ्यासाठी सर्वस्व आहेत. म्हणून मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलंय, मी जर निवडणूक लढवली असती तर आपण विजयासाठी 100 % प्रयत्न केले असते, पण आज महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विजयासाठी 1000 % प्रयत्न करू.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा अनुभव कोल्हापूरला नेहमी पुरोगामी दिशा दाखवेल, यात शंका नाही. येत्या निवडणुकीच्या रणनीतीवर बोलताना ते म्हणाले, निवडणुकीसाठी काहीच अडचण येणार नाही. वेळोवेळी मोठ्या महाराजांचा सगळ्यांशी संपर्क आहे. माझा आणि मालोजीराजेंचा देखील संपर्क आहे. पण एकदा ठरले की निवडणुकीपर्यंत सगळे काही व्यवस्थित होईल. कष्ट करण्यामध्ये आम्ही कुणीही मागे पडणार नाही, मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय, अगदी घरदाराचं तोंडही मी पाहत नाही. महाराष्ट्रात फिरतोय, लोकांशी संवाद साधतोय. निवडणूक काळातही तेच करू, असे त्यांनी सांगितले.