नवी दिल्ली
येत्या सात दिवसात देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्याचा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यात देशात खळबळ उडाली आहे. दक्षिण 24 परगणा येथील एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, ‘धार्मिक, सामाजिक आणि धोरणाचा विचार करूनच CAA लागू करण्यात येईल. CAA च्या अचानक अंमलबजावणीमुळे देशात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. देशात सात दिवसांत CAA लागू होईल. याची हमी मी तुम्हाला दिली आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सीएए हा देशाचा कायदा असल्याचं म्हटलं होतं. आणि हा लागू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यासोबतच त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सीएएबाबत लोकांची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे. त्यांना दुसऱ्यालाच नागरिकत्व द्यायचे आहे आणि इतरांना यापासून वंचित ठेवायचं आहे.
2019 मध्ये CAA झाला होता मंजूर
डिसेंबर 2019 मध्ये CAA संसदेत मंजूर झाला होता. याअंतर्गत 31 डिसेंबर 2014 पर्यंत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या गैर-मुस्लिम (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) यांना नागरिकत्व देण्यात येईल, असे सांगण्यात आले. कायदा मंजूर झाल्यानंतर आणि राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर देशाच्या विविध भागांत आंदोलने झाली. बंगालमध्ये 2020 मध्ये CAA विरोधात ठराव मंजूर करण्यात आला.