नवी दिल्ली
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर विविध आरोप केले जात असतानाच त्यांचे नातू रणजीत सावरकर यांच्या पुस्तकामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आज दिल्लीत रणजीत सावरकरांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकान नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या वेगवेगळ्या होत्या, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
३० जानेवारी रोजी महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. त्याच्या आदल्या दिवशी सावरकर यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. आणि या पुस्तकात नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या पुस्तकात रणजीत सावरकर यांनी गांधीजींच्या पोस्टमार्टमवरही आक्षेप नोंदवला आहे. रणजीत सावरकर यांचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर बाबींचा विचार करून आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय, असंही ते म्हणाले.
यावर काँग्रेसचे नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. गांधी विचारक आणि ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनीही या पुस्तकावर आक्षेप नोंदवला आहे. गोडसेने तीन वेळा महात्मा गांधीजींना मारण्याचा प्रयत्न केला होता. याचे पुरावेही आहेत. आणि गोडसेने गांधीजींची हत्या केली नाही तर कोणी केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.