मुंबई
संजय राऊतांसह ठाकरे गटाचे अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. ते घटनेविरोधात, बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री पदावर बसल्याचा आरोप राऊतांकडून केला जात आहे. दरम्यान यावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी जहरी टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीचा सोंगाड्या आहे, अशा शब्दात ज्योती वाघमारे यांनी टीकास्त्र सोडले.
वाघमारे पुढे म्हणाल्या, ‘सिल्व्हर ओकच्या तुणतुण्यावर मान डोलावणे एवढेच त्यांना जमते. फ्लॉप ठरलेल्या तमाशात लोकांचे आकर्षण टिकून राहावे यासाठी सवंग विधाने करणे एवढेच त्यांचे उद्योग आहेत. ते म्हणजे संजय डाउट. सिल्व्हर ओकच्या काकांना गेल्या इतक्या वर्षात सत्ता असूनही जे जमले नाही. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं आणि मराठा समाजाला न्याय दिला. आज बाळासाहेब आंबेडकरांनीही शिंदेंना हिरो म्हटलं आहे. त्यामुळे डाउट यांचा जळफळाट होतोय. तुम्ही कितीही जळलात तरी राज्यातील सकल मराठा समाज आणि सर्वसामान्य नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
मराठा समाजाचा मोर्चा वाशीपर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आरक्षणाचा मसुदा सुपूर्द केला. यानंतर ओबीसींनी याविरोधात संताप व्यक्त केला. तर विरोधकांनी मुख्यमंत्री मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी मसुद्याच्या नावाखाली मराठ्यांना अध्यादेश दिल्याचा आरोप केला जात आहे.