मुंबई – उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन कोणताही वाद नसताना, या जागेवर पूनम महाजन या विद्यमान खासदार असतानाही या जागेवर अद्याप भाजपानं उमेदवार जाहीर केलेला नाही. पूनम महाजन यांच्याऐवजी नवा चेहरा रिंगणात उतरवण्यात येईल, असं सांगण्यात येत होतं. मात्र अद्यापपर्यंत भाजपाला या जागेवरुन उमेदवार मिळत नसल्याचं दिसतंय.
आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची या मतदारसंघातून जोरदार चर्चा होती. त्यांनी खासदारकी लढवावी यासाठी पक्षश्रेष्ठीही आग्रही होते, मात्र राज्याच्या राजकारणात शेलार यांना जास्त रस असल्यानं ते ही निवडणूक लढवणार नाहीत, हे स्पष्ट दिसतंय. अशा स्थितीत या मतदारसंघातून माधुरी दीक्षित आणि रविना टंडन या सेलिब्रिटी चेहऱ्यांचीही चर्चा होती. मात्र त्यांनीही ही निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची माहिती आहे. अशा स्थितीत हा मतदारसंघ कुणाला सोडणार याची चर्चा रंगतेय.
मुस्लीम, ख्रिश्चन मतदारांचं प्राबल्य
या मतदारसंघात साडे पाच लाख मुस्लीम आणि ख्रिश्चन मतदान असल्याचं सांगण्यात येतंय. अशा स्थितीत सर्वसमावेशक चेहरा या ठिकाणी देण्याची आवश्यकता असल्याचं सांगण्यात येतंय. भाजपानं मुंबईतून दोन उमेदवार जाहीर केलेत हे देन्हीही उमेदवार मराठी नाहीत. त्यामुळं दक्षिण मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईपैकी एका मतदारसंघात एक मराठी उमेदवार भाजपाला द्यावा लागणार आहे. दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिल्यास या मतदारसंघातून राजहंस सिंह यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे.
पूनम महाजन यांना पुन्हा संधी
तसंच पूनम महाजन यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. महाजन यांना तिकिट दिलं नाही तर पराग आळवणी यांच्या नावाचा विचारही या मतदारसंघासाठी होऊ शकतो. मात्र भाजपाला या मतदारसंघात उमेदवार मिळत नाही, याची चर्चा सध्या रंगलेली आहे.