मुंबई- रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपाचाच आहे, असं ठआसून सांगताना यात कुणी लुडबूड करु नये, असं वक्तव्य नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलं. शिंदेंच्या शिवसेनेची ताकद किती आहे, असा प्रतिसवाल करत, मतदारसंघात भाजपाच वरचढ असल्याचं सांगताना राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मतदारसंघात नसल्याचं म्हटलय. पक्षानं उमेदवारी दिली तर नक्की आपण ही जागा लढवू आणि जिंकून येऊ असा विश्वासही राणेंनी व्यक्त केलाय. नारायण राणे यांनी मतदारसंघावर दावा करताना शिंदेंच्या शिवसेनेवर केलेल्या टीकेनं महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. राणेंच्या या विधानाती गंभीर दखल शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली असून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
किरण सामंत यांची माघार
दुसरीकडे या जागेवर तयारीत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी उमेदवारीतून माघार घेत असल्याची पोस्ट केली आहे. नरेंद्र मोदी यांना ४०० पेक्षा जास्त जागा मिळवून देण्यासाठी महायुतीत एकत्र काम करु असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी गेले दोन महिने बरेच प्रयत्न केले होते. राणे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अ्नेक गाठीभेटी त्यांनी घेतल्या होत्या. मात्र भाजपा या जागेसाठी आग्रही असल्यानं अखेर त्यांनी माघार घेतलेली आहे.
राणेंनी दम दिल्यानं उमेदवारी मागे- वैभव नाईक
किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सामंतांवर टीका केलीय.
सामंत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कशाप्रकारे दम दिला. अशाप्रकारे लायकी काढली हे कोकणातल्या सर्व जनतेने पाहिला आहे आणि यानंतर किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेतली, अशी टीका नाईक यांनी केलीय. दम देऊन किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेतली पण दम देऊन रत्नागिरी सिंधुदुर्गातील लोक तुम्हाला मतदान करू शकत नाही, असा टोला त्यांनी नारायण राणेंनाही लगावलेला आहे. केंद्रीय मंत्री असताना कोकणासाठी काय काम केले याचा हिशोब कोकणातील जनता राणेंना विचारेल असंही नाईक यांनी म्हटलय. या मतदारसंघात खासदार विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचाःउत्तर मध्य मुंबईतून भाजपाला उमेदवार मिळेना? महाजन, शेलार की अळवणी?