मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. अशातच आता सीबीआयने (cbi ) ‘लँड फॉर जॉब’ ‘ घोटाळा प्रकरणातील कारवाईला पुन्हा एकदा वेग दिला असून त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि अन्य आरोपींविरोधात अंतिम आरोपपत्र दाखल केलं आहे.त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे .
केंद्रीय रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी अनेकजणांना जमिनीच्या बदल्यात नोकरी दिली होती. शिवाय ही जमीन त्यांनी बाजारभावापेक्षा अतिशय कमी दराने खरेदी केली होती. असा आरोप त्यांच्यावर आहे . आता याप्रकरणी लालू यादव यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.सीबीआयने अंतिम आरोपपत्रात 38 उमेदवार आणि अन्य व्यक्तिंसह 78 आरोपींचा समावेश केला आहे. आता या आरोपानंतर ते काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . या प्रकरणामध्ये लालू प्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती(Missa Bharti) व रेल्वेच्या एका माजी महाव्यवस्थापकाचे नावे आहेत. तर केंद्रीय तपास यंत्रणांनी 23 सप्टेंबर 2021 रोजी या घोटाळ्याशी संबंधित प्राथमिक चौकशी करत 18 मे रोजी एफआयआर दाखल केला होता.तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, ‘लँड फॉर जॉब’ घोटाळा प्रकरणामध्ये रेल्वे अधिकार्यांनी अर्ज केल्यानंतर तीन दिवसांमध्ये ग्रुप डी पदांवर पर्यायी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या बदल्यात उमेदवारांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची जमीन हस्तांतरित केली होती.तसेच या जमिनी अगदी कमी बाजारभावापेक्षा घेतल्या गेल्या होत्या .
दरम्यान याआधी ऑक्टोबरमध्ये लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवींसह इतर १४ जणांविरुद्ध कथित ‘लँड फॉर जॉब’ घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.आता लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा सीबीआय या प्रकरणात ऍक्टिव्ह मोडवर आली आहे .