मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी हे उद्या ( 9 जून) सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. काल एनडीएच्या घटकपक्षांची महत्त्वाची बैठक संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांची एनडीएचा संसदीय नेता म्हणून निवड करण्यात आली. यासाठी राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे .या एनडीएतील (NDA) घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असं सूत्र ठरल्याची चर्चा आहे . त्यानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळण्याची चिन्हं आहेत. आता शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा समावेश करावा अशी मागणी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांच्याकडे केली आहे.त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार, श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहील आहे .
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये कल्याणचे श्रीकांत शिंदे, ठाण्याचे नरेश म्हस्के यांच्यासह सात जणांचा समावेश आहे. या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारून महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला आहे. दरम्यान नुकतीच श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. . काल शिवसेनेच्या सर्व खासदारांची दिल्लीत बैठक झाली. यावेळी या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला आहे. आता मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेची वर्णी लागणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
एनडीए मित्र पक्षांमध्ये महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचा प्रमुख समावेश आहे. यापैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्यक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवली आहे. तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं एकही जागा न लढवता एनडीएला पाठिंबा दिला होता. दरम्यान या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या विजयी खासदारांमध्ये बुलढाण्याचे प्रतापराव जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, हातकणंगलेचे धैर्यशील माने, छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे, मुंबई उत्तर पश्चिमचे रविंद्र वायकर असे सर्व वरिष्ठ नेते आहेत.