नवी दिल्ली – ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथनगरीतील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन रसिकांचे विशेष आकर्षण ठरले आहे. स्टॉल क्रमांक ९४ मध्ये पत्रकार संघाने प्रथमच महाराष्ट्राबाहेर आपल्या सदस्य पत्रकारांच्या पुस्तकांचे अभिनव पद्धतीने प्रदर्शन भरवले आहे. विविध क्षेत्रांतील घडामोडींचे दस्तावेजीकरण करणारे हे पुस्तकांचे संचित साहित्य संमेलनात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर सादर झाले असल्याने त्याची विशेष दखल घेतली जात आहे.
या स्टॉलला खासदार सुप्रिया सुळे, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, सरहदचे संजय नाहर, तसेच नांदेडचे माजी आमदार गंगाधर पटणे यांनी भेट दिली. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, प्रवीण बर्दापूरकर, जयदेव डोळे, भाऊ तोरसेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही स्टॉलला भेट देऊन पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
स्टॉल क्रमांक ९४ मधील पुस्तकांमधून पत्रकारितेतील चार पिढ्या वाचकांसमोर आल्या आहेत. दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत. उद्या, रविवारी २३ फेब्रुवारी सायंकाळपर्यंत हा अनमोल ठेवा साहित्यप्रेमींना पाहता येणार आहे.
या अनोख्या उपक्रमाची प्रशंसा करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, संजय आवटे, पराग करंदीकर, तुळशीदास भोईटे, मुकुंद कुळे, नितीन सप्रे, यमाजी मालकर, प्रसन्न जोशी, सागरिका घोष, संदीप राजगोळकर, शिवाजी काळे, दिलीप साळुंके, पत्रकार-कवी मंगेश विश्वासराव, राजेश जोष्टे, मुकुल आव्हाड यांचा समावेश होता.
याशिवाय, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे डायरेक्टर महेश अय्यंगार, स्टोरीटेलचे संतोष देशपांडे, निवेदक मिलिंद कुलकर्णी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्ती डॉ. राजेंद्र जाधव, विजय जाधव, काशीनाथ माटल, शिल्पा सुर्वे, मराठी व्यावसायिक बिल्डर असोसिएशनचे नितीन देशपांडे, दिल्लीतील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. विशाल जोगदंड, ऍड. चपळगावकर, रवीप्रकाश कुलकर्णी, रोहन नामजोशी यांनीही स्टॉलला भेट दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि स्टॉलचे नियोजन आस्थेने सांभाळणारे अंतर्गत हिशोब तपासनीस हेमंत सामंत साहित्यप्रेमींचे स्वागत करताना दिसत आहेत.