रांची
चंपई सोरेन झारखंडचे १२ वे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवार दुपारी १२.२० चंपई यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. चंपई यांच्यासह काँग्रेसचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. चंपई सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असू शकतात, असे बोलले जात आहे. सरकारला १० दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागेल. शपथविधीनंतर सर्व आमदार हैदराबादला रवाना झाले.
हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळा प्रकरणात अटकेनंतर चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. गुरुवारी रात्री 11 वाजता राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी बोलावले होते. मात्र राजभवनातून बाहेर पडल्यानंतर, शुक्रवारी दुपारी 12.15 वाजता शपथ घेणार असल्याचे चंपाई यांनी सांगितले होते.
सर्वोच्च न्यायालयाने सोरेन यांची याचिका फेटाळली
आज सकाळी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अटकेविरोधात सोरेन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं, तुम्ही आधी उच्च न्यायालयात जायला हवं होतं. जर आम्ही एका व्यक्तीला परवानगी दिली तर सर्वांना ती द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. तपास यंत्रणेने ३१ जानेवारीच्या रात्री सोरेन यांना अटक केली होती.
केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, हेमंत सोरेन यांच्या सरकारने लूट चालवली होती. जमीन घोटाळे आणि खाण घोटाळे उघडकीस आले. या सगळ्यातून वाचण्याचा ते प्रयत्न करत होते, त्यामुळे आज उत्तर देणं कठीण झालं.