चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये काँग्रेस, भाजप आणि वंचित या प्रमुख पक्षांशिवाय एक उमेदवार चर्चिला जात आहे. सर्वसाधारणपणे निवडणुकीपूर्वी उमेदवारांकडून वीज, पाणी, रस्ते, विकास आदींच्या नावाखाली प्रचार केला जातो. मात्र चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील वनिता राऊत एक वेगळाच मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
रेशनच्या दुकानात स्वस्त धान्याबरोबरच स्वस्त दारू मिळावी, दिवाळीवेळी आनंदाच्या शिधासोबत उच्च दर्जाची व्हिस्की आणि बिअर शिधापत्रिकांधारकांना देण्याच यावी, याची मागणी केली आहे. निवडणुकीत आपण जिंकलो तर खासदार निधीचा उपयोग व्हिस्की आणि बिअर उपलब्ध करून देणार असल्याचं या उमेदवाराचं म्हणणं आहे. या उमेदवाराचं नाव आहे वनिता राऊत. या महिलेचा प्रचार पाहून अनेकांना धक्काच बसला. सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी निवासी वनिता राऊत या 2019 मध्ये चिमूर विधानसभा निवडणुकीत उभ्या होत्या. मात्र, त्या वेळी त्यांचा पराभव झाला होता.
राऊत यांनी २०१९ विधानसभेची निवडणूक लढवली होती, यावेळी त्यांना २८६ मतं पडली होती. त्यावेळीही त्यांना अशा प्रकारची ऑफर दिली होती. मात्र अशी आश्वासनं देऊनही त्यांनी केवळ २८६ मतं पडली होती. त्यावेळी त्यांना पडलेल्या मतांचीही चर्चा झाली होती.