मुंबई- महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी काही जागांवरुन अद्यापही सहमती झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यात प्रामुख्यानं ठाणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळतायेत. तर दुसरीकडं हेमंत गोडसे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईत पोहचले आहेत. नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळावी, यासाठी गोडसे आग्रही आहेत. दुसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्गावरुनही वाद सुरुच आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग सोडण्याची भाजपाची तयारी?
रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानण्यात येतो. या मतदारसंघात नारायण राणे यांना कमळाच्या चिन्हावर लढवावे, यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठी आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय. तर दुसरीकडे किरण सामंत हे या जागेसाठी प्रयत्न करतायेत. धनुष्यबाण हे चिन्ह कोकणात घराघरात परिचित असल्यानं या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचाच उमेदवार द्यावा, अशी मागणी होतेय.
भाजपानंही चर्चांच्या अनेक फेऱ्यांनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिंदेंना सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्या बदल्यात ठाणे किंवा कल्याण मतदारसंघांपैकी एकाचा आग्रह धरलेला आहे.
शिंदे ठाणे किंवा कल्याण सोडणार?
ठाणे आणि पालघर परिसरातील तिन्ही लोकसभा मतदारसंघ हे सध्या शिवसेनेकडे आहेत. यातील ठाणे लोकसभा मतदारसंघ सुरुवातीला भाजपाचा बालेकिल्ला होता. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या आग्रहानंतर ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्यात आला. आता महायुतीत ठाण्याची जागा भाजपाला मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठी आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय.
कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्यांनी निवडणुकीचा प्रचारही सुरु केलेला आहे. ठाण्याची जागा शिवसेनेची असली तरी सध्याचे खासदार राजन विचारे हे ठाकरेंसोबत आहेत. रवींद्र फाटक किंवा प्रताप सरनाईक या दोन नावांची शिंदेंच्या शिवसेनेकडून चर्चा सुरु आहे. हिंदुत्ववादी विचारांचे प्राबल्य असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा आग्रह धरण्यात येतोय.
नवी मुंबईत काल झालेल्या मेळाव्यात दीपक केसरकर यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिंदेंच्या शिवसेनेकडेच राहावा अशी आग्रही मागणी केलेली आहे. तर केसरकर यांनीही धनुष्यबाणाचाच उमेदवार असेल हे स्पष्ट केलेलं आहे.आता या पेचप्रसंगावर मुख्यमंत्री काय तोडगा काढणार हा प्रश्न आहे.
हेही वाचाःगाव तिथे बार, आनंदाच्या शिधासोबत व्हिस्की अन् बिअर; चंद्रपूर महिला उमेदवाराचं अजब आश्वासन