Twitter: @vivekbhavsar
मुंबई
भारतीय जनता पक्षाचे राज्यातील बाहुबली नेते देवेंद्र फडणवीस हे कधी कोणाला जवळ करतील आणि कधी लाथ मारून बाजूला करतील हे सांगता येत नाही. भ्रष्टाचार आणि भ्रष्ट नेत्याला पाठीशी न घालणारे फडणवीस यांच्या रागाचा बळी लवकरच त्यांचा एक जवळचा मंत्री ठरणार आहे आणि त्याला कारणीभूत ठरणार आहे त्या मंत्र्याकडील एका महिला अधिकारी.
देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये भाजप – शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यांची काही खास माणसं जवळ केली, त्यांना राजकीय आणि आर्थिक बळ दिले. त्यामुळे दुसऱ्या फळीतील भाजपचे अनेक नेते राजकारणात पुढे आले. मात्र फडणवीस यांच्या स्वभावाचा फायदा घेऊन ज्यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर केला, आर्थिक गैरव्यवहार केले त्यांना फडणवीस यांनी हलकेच बाजूला केले.
अशाच एका मंत्र्याचे एक खाते येत्या काही दिवसात काढून घेण्यात येणार आहे, अशी चर्चा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आहे. फडणवीस यांच्या मर्जीतील या मंत्र्याकडील एका महिला अधिकाऱ्याने मोठा टेंडर घोटाळा केल्याची मंत्रालयात चर्चा आहे. या महिला अधिकाऱ्याला भेटल्याशिवाय सबंधित मंत्री कुठल्याही फाईलवर सही करत नव्हता, असे सांगितले जाते. निधी वाटप असो की कामाचे टेंडर देणं असो, त्या लोकांना मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावून घेत असे.
शासकीय कामे मिळण्यासाठी आता परवलीचे शब्द बदलले आहेत. “रिचार्ज” हा अत्यंत नवीन शब्द आहे. रिचार्ज झाल्याचा मेसेज गेल्यानंतरच संबंधित व्यक्तीचे काम होते, अशी काम करणाऱ्या एजंटांमध्ये चर्चा आहे. रिचार्ज किती करायचे हे त्या त्या कामावर, निविदेच्या रकमेवर अवलंबून असते.
मंत्रालयातील संबंधित विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या चर्चेनुसार या महिलेने रिचार्ज झाल्याचा निरोप दिल्यावरच तो खास मंत्री पुढे सह्या करत होता. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असंख्य तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे चिडलेल्या फडणवीस यांनी त्यांची परवानगी घेतल्याशिवाय एक रुपयाचाही निधी वाटू नये असे सक्त निर्देश त्या मंत्र्याला दिले आहेत, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या याच मंत्र्याच्या खाजगी सचिवाने मंत्र्याला अंधारात ठेवून परस्पर निविदा रकमा वाढवून त्या मंजूर करून घेतल्या होत्या. ही बाब फडणवीस यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तो मंत्री आणि त्या खासगी सचिवाची कानउघाडणी केली होती, अशी माहिती त्या घटनेचा साक्षीदार असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली.
पंधरा दिवसापूर्वी याच मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट सभागृहाला लागून असलेल्या चेंबरमध्ये बोलावून कडक शब्दात जाब विचारला होता अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. हा मंत्री शिवसेनेच्या आमदारांना अत्यंत कमी निधी देतो आणि भाजपच्या मतदारसंघात हातचे न राखता निधी वाटप करत असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तक्रार होती, अशी माहिती या भाजप नेत्याने दिली. सुमारे ४५ मिनिट बंद दाराआड सुरू असलेल्या या भितीनंतर शिंदे बाहेर ताटकळत उभ्या असलेल्या आमदारांना न भेटता रागात थेट मंत्रालयाच्या बाहेर निघून गेले होते.
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने एक खाते गमावून बसलेल्या या मंत्र्यावर आणखी एक महत्वाचे खाते गमावण्याची वेळ आली आहे. हे खाते सोडा असा इशाराच फडणवीस यांनी या मंत्र्याला दिला आहे. त्यामुळे रडकुंडीस आलेल्या या मंत्र्याच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहणेच शिल्लक राहिले आहे, अशी चर्चा आहे.
 
								 
                                 
                         
                            
