मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये ८ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. मात्र पहिल्या यादीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूरातून संजय मंडलीक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे आणि हातकणंगलेमधून धैर्यशिल माने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
काल २७ मार्च रोजी रात्री हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांना उमेदवारी मिळण्याबाबत निश्चितता व्यक्त केली जात होती. याला सदाभाऊ खोतांकडून विरोध दर्शवला जात होता.
या यादीत ठाणे, नाशिक आणि कल्याण मतदारसंघांची घोषणा करण्याच आलेली नाही. नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावाला भाजपकडून विरोध केला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने त्या जागेवर दावा केला आहे. छगन भुजबळ या जागेवरुन निवडणूक लढवू शकतात. तर शिंदेंच्या घरच्या ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. मात्र ठाणे हा बालेकिल्ला असल्याने शिंदे गट ती जागा सोडण्यात तयार नाहीत. कल्याण या जागेवरुन एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र पहिल्या यादीत त्यांच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. यवतमाळ-वाशिमच्या जागेवर इच्छुक असलेल्या भावना गवळी यांच्या नावाला भाजपकडून विरोध असल्याने यावरही अद्याप निर्णय झालेला नाही असंच दिसून येत आहे.
या मतदारसंघात ठाकरे आणि शिंदेंमध्ये होणार लढत..
दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील
मावळ- संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे
आतापर्यंत राज्यातील ४८ जागांपैकी भाजपने सर्वाधिक २४ उमेदवार जाहीर केले असून त्यानंतर काँग्रेसने १२, शिवसेना ठाकरे गटाने १७ आणि अजित पवार गटाने २ उमेदवार जाहीर केले आहेत. शिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितच्या ८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.